टीम हॅलो महाराष्ट्र : बेळगाव सीमा प्रश्नी लढताना हौताम्य पत्करलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून रोखण्यात आले. तसेच कर्नाटक पोलिसांकडून राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांना धक्काबुकी करण्यात आली. या प्रकरणी संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा निषेध करेल काय, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच मी उद्या बेळगावला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलीसांची धक्काबुक्की..
हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्या पासून रोखले..महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा साधा निषेध तरी करेल काय?
मी ऊद्या बेळगावला जात आहे.
पाहू काय घडतंय.
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) January 17, 2020
काय आहे प्रकरण?
भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात डांबला गेल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले. १७ जानेवारी १९५६ या दिवशी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. यामध्ये निपाणी येथील कमलाबाई मोहिते, बेळगाव येथील पैलवान मारुती बेन्नाळकर यांच्यासह अन्य तिघांचा समावेश होता. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येते. हुतात्मा चौकात शुक्रवारीही सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे अभिवादन करण्यात आले. राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर ताफा न घेता कर्नाटकी पोलिसांना हुलकावणी देत हुतात्मा चौकात दाखल झाले. मात्र कर्नाटकी पोलसांनी धक्काबुक्की करत त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचे संतप्त पडसाद सीमाभागात उमटताना दिसत आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत उद्या कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. कर्नाटक सरकार संजय राऊत यांना कशी वागणूक देतेय हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरेल.