विशेष प्रतिनिधी | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असले तरी अद्याप खातेवाटपावरुन खलबते कायम आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील खातेवाटपाच्या वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
यशवंतराव चव्हाण सेंटर मधील काँग्रेस राष्ट्रवादीची बैठक तब्बल तीन तासांनी संपली. मात्र खातेवाटपाबाबत कोणत्याही नेत्याने प्रसारमाध्यमांना माहिती दिलेली नाही. काँग्रेस राष्ट्रवादी विधानसभेच्या अध्यक्ष पदाबाबत आग्रही असल्याचं बोललं जातंय. विधानसभा अध्यक्ष पद कोणाकडे यावरुन दोघांमधील वाद कायम असून अद्याप त्यावर तोडगा निघालेला नाही असं सुत्रांकडून समजत आहे.
दरम्यान महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात विधानसभेचे अध्यक्षपद अतिशय महत्वाचे ठरणार आहे. अध्यक्ष पद कोणत्या पक्षाकडे जाणार यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अध्यक्ष पदावरील दावा सोडायला तयार नाहीत. काँग्रेस एकवेळ उपमुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे मात्र अध्यक्षपद सोडायला तयार नाही असं सुत्रांकडून समजत आहे.