कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्ह्यातील कुडणूर हे गांव जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे या गावचे प्रश्नं सोडविताना प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यातच कुडणूर – कोकळे रस्त्याचा प्रश्नं गेली अनेक वर्षे भिजत पडला आहे. या कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रुपांतर करुन हा रस्ता डांबरी रस्ता करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने केली जातेय. मात्र प्रशासन त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. याचा नाहक त्रास दोन्ही गावच्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता त्वरीत डांबरी रस्ता करण्यात यावा, अशी मागणी कुडणूरचे सरपंच तथा वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते मा. श्री. अमोल पांढरे यांनी खास निवेदनाद्वारे जिल्हा नियोजन समितीकडे केली आहे. तसेच या मागणीसाठी त्यांनी ग्रामपंचायतमार्फत प्रस्ताव दाखल करुन, त्याला ग्रामसभेचा ठरावही जोडला आहे.
कुडणूर हे जवळपास ३ हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावाला आजही एसटी बस येत नाही. त्यामुळे तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ग्रामस्थांना कोकळे गावच्या एसटी बस थांब्यावर जावे लागते. विशेष म्हणजे कुडणूर हे गाव जत तालुक्यात आहे. तर कोकळे हे गाव कवठेमहांकाळ तालुक्यात आहे. म्हणजे ग्रामस्थांना बाहेरगावी जाण्यासाठी दुस-या तालुक्याच्या एका गावातील बस थांब्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातच कुडणूर – ते कोकळे हा रस्ता कच्चा आणि आरुंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे – झुडपे वाढली आहेत. रस्त्यावर ना दिवाबत्तीचीही सोय आहे ना एखादे पंक्चरचे दुकान, त्याशिवाय या मार्गावर नेहमी धुळीचे साम्राज्य असते. पावसाळ्यात तर हा मार्ग प्रचंड निसरडा होतो. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. रस्त्यावरुन ये – जा करताना, लहान मुले, जेष्ठ नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागते.
शालेय विद्यार्थी, जनावरे, अवजड वाहनं या सर्वांसाठीच या रस्त्यानरुन जाणं एक दिव्य आहे. त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पक्का डांबरी रस्ता करावा आणि विकासाला चालना द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनीही आत्तापर्यंत केवळ यासंदर्भातील आश्वासने दिली आहेत. मात्र हा प्रश्नं मार्गी लावला नाही. त्यामुळे कुडणूरचे सरपंच मा. अमोल पांढरे यांनी थेट जिल्हा नियोजन समितीकडे यासंदर्भातील प्रस्ताव दिला आहे. तसेच या प्रस्तावाला २६ जानेवारी २०२० रोजी झालेल्या ग्रामसभेतील ठरावही जोडला आहे. तसेच जर हा प्रश्नं तात्काळ सोडविला नाही तर ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचेही दिसून येत आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.