कोल्हापूर प्रतिनिधी | ‘गणपती बप्पा मोरया’, ‘मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात कोल्हापुरमध्ये घरगुती आणि सार्वजनीक गणेशांचे आगमन होत आहे. डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या गजरात बाप्पाचं आगमन होत आहे. पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त ठेवला आहे. गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे कोल्हापूरचे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला होता. या परिस्थितीवर मात करून ही कोल्हापूरकर गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत.
ढोल-ताशांचा गजर ,बेंजोचा गजर , झांज पथकांचा गजर करत कोल्हापुरात गणेश मुर्त्यांचे आगमन घरोघरी आणि मंडळात होत आहे. कोल्हापूर शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली ,बापट कॅम्प, पापाची तीकटी , गंगावेश परिसरात गणेश भक्तांचा मोठी गर्दी आहे. पर्यावरणाचा विचार करुन कोल्हापुरातील अनेक गणेश भक्तांनी ‘इको फ्रेंडली’ गणेश मूर्त्यांना प्राध्यान दिले आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोल्हापुरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं चित्र दिसून येत आहे. लाडक्या गणपती बाप्पाला घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी एका मुस्लिम रिक्षाचालकाने घेतली आहे. विशेष म्हणजे हा रिक्षाचालक दिवसभर फ्री सेवा देत आहे. आरिफ रशिद पठाण असं या रिक्षाचालकाचं नाव आहे. 9 वर्षापासून सुरु असलेल्या त्यांच्या या उपक्रमाला आता 25 रिक्षचालकानी हातभार लावला आहे. यांतही बहूतांश मुस्लिम रिक्षचालक आहेत.