वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्वीघ्नम कुरुमे देवो सर्वकार्येषु सर्वदा
अगं नैवेद्य आणतेस ना?
हो हो हो… आलेच
फुलं, पूजा, वस्त्र, जानव अष्टगंध ह्म्म्म.. झालं सगळं… आज किती देखणा दिसतोय ना आपला गणपती. हो पूजा पण छानच झाली आहे…. चला आता आरती करूया… हो थांबा हा ! मी s
सर्वाना बोलावते… प्रतमेश, प्रणव
हो आई. आलोच दादा मंडळाचा गणपती आणायला गेलाय… बर चला आपण आरती करून घेऊ… सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची.
गणेश चतुर्थी च्या दिवशी प्रत्येक घराघरात काहीशी अशीच लगबग पाहायला मिळते. गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद व माग महिन्याची शुक्ल चतुर्थी या दिवशी सर्व घरामध्ये आणि सार्वजनिक मंडळामघ्ये श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठपणा केली जाते. तसेच दाररोज सकाळी आणि संध्याकाळी गणेश मूर्तीची पूजा आणि आरती केली जाते.
शंकर आणि पार्वतीच्या या अनंत चतुर्थी पर्यंत मनोभावे पूजा केली जाते त्यानंतर विसर्जन केले जाते. काही ठिकाणी हा गणपती 5 दिवस असतो.
हा उत्सव महाराष्ट्र सोबतच कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश तसेच परदेशात देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जो तो आपल्या परीनं हा सण साजरा करतो. कोणताही सण समारंभ असो किंवा शुभ कार्य सर्वात आधी गणेशाच्या पूजनाचे महत्व असते. म्हणून गणेशाला आधीदैवत असे म्हणतात.
हिंदू धर्मानुसार हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेल्या या देवतेबाबत बऱ्याच आख्यायिका प्रसिद्ध आहेत. अगदी त्याचे मुख हत्तीचेच का? इथपासून ते त्याचे रूप, त्याची आवड निवड इथपर्यंत. गणपती हा महाभारत या महान प्राचीन ग्रंथाचा लेखनिक होता असे म्हणतात. संपूर्ण भारतात गणेश हा पूजनीय असून विशेषतः महाराष्ट्रात हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. आजही ही परंपरा अगदी तशीच अखंड चालू आहे.
पेशव्यांच्या काळात हा उत्सव फक्त घरगुती स्वरूपातच साजरा केला जायचा. मात्र इ. स. 1893 साली लोकमान्य टिळकांनी सर्व लोक एकत्रित यावेत म्हणून हा उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्याची साजरा प्रथा चालू केली. सुरवातीला सनातनी आणि सुधारक लोकांनी टिळकांवर खूप टीका केली मात्र नंतर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपाला मान्यता देण्यात आली. पुण्यात हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
गणपतीची अनेक नावं प्रसिद्ध आहेत विनायक, लंबोदर, एकदंत, प्रथमेश, वक्रतुंड अशा अनेक नावांचा पुराणांमध्ये आढळतो. तमिळ भाषेत गणेशाला पिल्लेयर हे नाव आहे. पिल्लेय म्हणजे हत्तीचे पिल्लू तिथे हत्तीच्या पिल्लांची देवता समजून गणेशाची पूजा करण्याची पद्धत आहे.
भारताबरोबरच परदेशातही गणेशोत्सव साजरा केला जातो. मॉरिशस, फ्रान्स (फ्रान्स मधल्या श्री मनिक्का विनायक मंदिरात )श्रीलंका, थायलंड, अमेरिका, चीन, जपान या देशांमध्ये देखील भारतीय परंपरेप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो. फक्त त्या -त्या ठिकाणी त्या -त्या संस्कृतीचा ट्विस्ट दिलेला असतो. आता चीनचेच उदाहरण द्यायचे झाले तर चीनमध्ये गणपतीची आरती चिनी भाषेत म्हंटली जाते. परदेशात स्थायिक झालेले भारतीय नागरिक परदेशातही आनंदाने आणि थाटामाटात तिथं हा सण साजरा करतात.
आता वॉशिंग्टन मध्ये राहणाऱ्या सुयोग आणि प्रियदर्शनी पाटील हे दाम्पत्य अगदी भारतीय पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या प्रियदर्शनी यांनी आजही आपली भारताशी आणि भारतीय संस्कृतीशी जोडलेली नाळ मजबूत ठेवली आहे. प्रियदर्शनी यांनी वॉशिंग्टन मध्ये स्वतः गणेशमूर्ती तयार केली आहे. दहा दिवस ते या गणरायाची थाटामाटात पूजा करतात. जसजसे दिवस पालटत गेले तसतसे गणेशोत्सवाचे रूपही बदलत गेल्याचे आपल्याला पहायला मिळते. गणेशच्या मूर्ती पूर्वी मातीच्या असायच्या मात्र आता त्याची जागा फायबर आणि प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तींनी घेतली आहे. त्यामुळं नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
म्हणूनच गेल्या काही वर्षपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे कल आहे. जल, वायू, ध्वनी, प्रदूषण थांबवण्यासाठी या गणेशोत्सव काळात विशेष प्रयत्न केले जातायत. पण प्रत्येकाने ठरवून या पर्यावरण पूरक गणेश उत्सवात सहभाग घेतला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने यंदाचा गणेशोत्सव अर्थपूर्ण ठरेल. तशी सद्बुद्धी गणपती बाप्पा सर्वांना देवो हीच सदिच्छा.
यंदाच्या गणेशोत्सवावर महाराष्ट्रात आलेल्या महापुराचे, त्याचबरोबर दुष्काळाचे सावट आहे. कोल्हापूर, सातारा, जिल्ह्यात आलेल्या महापुराचा यंदाच्या उत्सवावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे आपण आपल्या परीने थोडी थोडकी मदत या पुरग्रताना करूया. जेणेकरून त्यांच्याही घरात या उत्सवाच्या निमित्ताने आनंद येईल आणि खऱ्या अर्थाने आपला यंदाचा गणेशोत्सव सार्थकी लागेल. हा गणेशोत्सव तुम्हाला आनंद, सुख आणि शांती प्रदान करो. हॅलो महाराष्ट्र कडून गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…