मुंबई प्रतिनिधी | गणेशोत्सवाच्या आधी म्हाडा प्राधिकरण गिरणी कामगारांसाठी ‘शुभवार्ता’ देण्याच्या तयारीत आहे. कारण येत्या आठवडाभरात गिरणी कामगारांसाठी ५ हजार ९० घरांची लॉटरी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली.
१५ ऑगस्टपर्यंत ५ हजार ९० घरांची लॉटरी काढण्याची घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली होती. मात्र, गिरणी कामगारांच्या यादीची छाननी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने लॉटरी जाहीर करण्यात अडथळा निर्माण झाला. आता ही छाननी प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर असून, या आठवड्यात प्राधिकरणाच्या नियोजित बैठकीत लॉटरीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यात बॉम्बे डाइंग मिल कामगारांसाठी ३ हजार ३६४ घरे, श्रीनिवास मिल कामगारांसाठी ४८२, तर एमएमआरडीएसाठीच्या १ हजार २४४ घरांचा समावेश असेल. मात्र, सुमारे पावणे दोन लाख गिरणी कामगारांना घर देण्याचे आव्हान सरकारसमोर अद्यापही कायम आहे.
त्याशिवाय १५ऑगस् पूर्वी राज्यभरात सुमारे १४ हजार ६२१ घरांची लॉटरी काढण्याची घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली होती. मात्र, १५ आगस्ट उलटून गेल्यानंतरही लॉटरी जाहीर झालेली नाही. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभेची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, या लॉटरी प्रक्रियेला खीळ बसण्याची शक्यता आहे.
म्हाडाने ९ मे, २०१६ रोजी सहा गिरण्यांच्या जागेवरील २, ६३४ घरांची, २ डिसेंबर, २०१६ रोजी पनवेलमधील एमएमआरडीएच्या २ हजार १७ घरांची लॉटरी काढली होती. यातील विजेत्यांपैकी बहुतांश जणांना अद्याप ताबा मिळालेला नाही. नवीन लॉटरी काढताना या विजेत्यांना ताबा देण्याच्या प्रक्रियेला गती येणे अत्यावश्यक असल्याचे मत गिरणी कामगार नेते प्रवीण घाग यांच्याकडून व्यक्त होत आहे.