सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर शहरापासून चौदा किलोमीटर अंतरावर दक्षिण सोलापूर तालुक्यात जेमतेम साडेचार हजार लोकसंख्या असलेल दर्गनहळ्ळी हे गाव. याच गावात राहणारा काशीराज कोळी हा तीस वर्षीय युवक वाचन संस्कृती वाढावी यासाठी झपाटून उठला आहे. भिलार गावापासून प्रेरणा घेत काशीराजने गावात बैलगाडीच्या माध्यमातून चालते-फिरते वाचनालय सुरू केले आहे. गावात दर रविवारी सकाळी बैलगाडीत फिरते वाचनालय त्याने वाचकांसाठी उपलब्ध केले आहे. .
सोलापूर येथे सध्या ग्रंथालय लिपिक पदावर कार्यरत असलेल्या काशीनाथला वाचनाची प्रचंड आवड आहे. आपल्याही गावात छोटेखानी वाचनालय असावे अशी त्याची मनोमन इच्छा होती. वाचन संस्कृतीचा वसा घेतलेल्या काशीनाथने पदरमोड करून साडेपाच हजार रुपयांची दोनशे पुस्तक विकत घेतली. त्याची धडपड पाहून त्याला श्रीमती वनिता कायत आणि सचिन बिजगे, कल्लप्पा डांगे, कल्लप्पा चतुर्भुज यांनी आर्थिक मदत करत वाचनालय सुरु करण्यासाठी हातभार लावला.
आपले वाचनालय अधिकाधिक समृद्ध व्हावे, यासाठी काशिनाथने आपले मित्र तसेच कामांवरील अन्य सहकाऱ्यांना पुस्तके रद्दीत टाकण्याऐवजी मला द्या, असे आवाहनही केले. काशीनाथच्या प्रयत्नाला त्याच्या मित्रांनीही पुस्तके देऊन मदत केली. काशिनाथ दहावीत असल्यापासून पुस्तके गोळा करत आहे. ह्याच पुस्तकांचा उपायोग पुढे वाचनालय सुरु करण्यास त्याला झाला. पुस्तकांच्या संग्रहानंतर दोन वर्षांपूर्वी गावात स्थानिकांसाठी कुठल्याही सरकारी अनुदानाविना काशिनाथने ‘माउली सार्वजनिक ग्रंथालय’ नावाने मोफत वाचनालय सुरु केले. हे वाचनालय आता ग्रामस्थांना व लहान मुलांना वाचनाची गोडी लावण्यास मदत करत आहे. काशिनाथ सांगतो की, “सोशल मीडियाच्या जमान्यात विद्यार्थी वाचनाकडे पाठ फिरवतोय अशी ओरड पालक आजही करत आहेत. हे सतत आरडाओरडा करण्यापेक्षा कृतीवर भर देत त्याने वाचकांना वाचनाकडे खेचून आणण्यासाठी नवा उपक्रम म्हणून फिरते वाचनालय बैलगाडीत सुरू केले. गावाकडच्या विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोहोचण्याच्या प्रयत्नातून ही एक वाचन चळवळ यातून उभी राहीली.”
काशीनाथ ग्रामस्थांना ही पुस्तके परत देण्याच्या अटीवर मोफत देतात. भरमसाठ पुस्तके, अन् वाचनालयाचा मोठा बॅनर पाहून लहान मुले बैलगाडीभोवती एकच गलका करतात. शैक्षणिक, मनोरंजनात्मक, आत्मचरित्र, माहितीपट, अनुवाद, कथा आणि वर्तमानपत्रे या बैलगाडी वाचनालयात उपलब्ध वाचकांसाठी उपलब्ध आहेत.