जमीन एनए कराची आहे ?? जाणून घेऊया जमीन एनए करण्याची सोप्पी पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली मोठ्या प्रमाणात जमिनीची मागणी वाढत आहे. याची कारणे विविध आहेत. पण जर शेतजमीन शेतीव्यतिरिक्त कामांसाठी विकत घ्यायची असेल तर त्याचे अकृषी अर्थात नॉन ऍग्रिकल्चरल (एनए) करावे लागते. महाराष्ट्र जमीन महसूल (कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९६९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याच विकास कामाकरिता करता येत नाही. तो करायचा असेल तर त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक असते. एनए करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळणारा अर्ज भरून त्यावर कोर्टाचा ५ रु स्टॅम्प लावावा लागतो. त्याचबरोबर जमिनीच्या ७/१२ च्या उताऱ्याच्या ४सत्यप्रती, जमिनीचा फेरउतारा, जमिनीचा ८ अ उतारा, तालुका भूमी अभिलेख रेकॉर्ड कार्यालयाने दिलेला जमिनीचा नकाशा लागतो. 

जर आपल्या जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर महसूल अधिकाऱ्यांकडून (तलाठी किंवा तहसीलदार) कोणतीच कागदपत्रे नसल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते.  इमारतीसाठी एनए करायचे असल्यास इमारतीच्या प्लॅनच्या ८ प्रती, जमीन कोणत्याही प्रकल्पाच्या आड येत नसल्याची खातरजमा करण्यासाठी चालू ७/१२ उतारा, जमीन राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, जलदगती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलदगती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. ग्रामीण भागात ग्राम पंचायतीने ना हरकत प्रमाणपत्र, शहरी भागात महापालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र गरजेचे असते. जमीन बॉम्बे वहिवाट आणि शेती कायदा १९४८ अंतर्गत असेल तर एनए साठी परवानगी ४३/६३ नुसार मिळते. एनए करण्यात येणाऱ्या जमिनीवर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सेवा सोसायटीचे कोणतेही कर्ज किंवा भरणा नसल्याचा दाखला देखील लागतो. जमीन एनए करायची आहे ती कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही असे सांगणारे तलाठ्याचे पत्र अशी वरील सर्व कागदपत्रे एनए करण्यासाठी लागतात. 

जमिनीचे एनए करत असताना सरकारकडे शेत जमिनीचे रहिवासी जमिनीत रूपांतर करायचे असल्यास रेडी रेकनर (सरकारने ठरवून दिलेला भाव) नुसार जमिनीच्या ५०% रक्कम भरावी लागते. शेतजमिनीचे व्यावसायिक जमिनीत रूपांतर करायचे असल्यास जमिनीच्या बाजारभावाच्या ७५% रक्कम भरावी लागते. शेतजमिनीचे निमसरकारी जागेत रूपांतर करायचे असल्यास जमिनीच्या बाजारभावाच्या २०% रक्कम भरावी लागते. रहिवासी एनएचे औद्योगिकमध्ये रूपांतर करायचे असल्यास जमिनीच्या किंमतीच्या २०% रक्कम भरावी लागते. 

एनए साठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करायचा असतो. अर्ज मिळाल्यावर जिल्हाधिकारी ७ दिवसात तहसीलदारांना तुमचा अर्ज पाठवितात. तहसिलदार या अर्जाची छाननी करून अर्जदार व्यक्तीच जमिनीचा मालक आहे की नाही याची खात्री करतात, तलाठ्यांकडून जमिनीची चौकशी करून घेतात. तहसिलदार, जमीन एनए केल्यास कोणत्याही पर्यावरणीय अडचणी किंवा कोणत्या प्रकल्पास धोका पोहोचणार नाही याची पडताळणी करतात. ही सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जमीन रूपांतराचा आदेश काढतात. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन रूपांतरणाचा आदेश काढल्यानंतर तलाठी कार्यालयात जमिनीची ‘एनए’ नोंद केली जाते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’