बारामती प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण चागलेच तापले आहे. सर्वत्र उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रचारासाठी धावाधाव सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीतही राष्ट्रवादी आणि भाजपकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे.
बारामतीत अजित पवार यांच्या प्रचाराची धुरा त्यांच्या कुटुंबियांबरोबरच त्यांचे धाकटे पुत्र जय पवार हे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या भागात जाऊन जय पवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. आज बारामतीत जय पवार हे कार्यकर्त्यांसमवेत प्रचार करत असताना त्यांना भाजप कार्यकर्ते भेटले. एकमेकांना उमेदवारांचं पत्रक देत आमच्या उमेदवारांना मतदान करा असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. त्यामुळे बारामतीत राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं असल्याचे अनेकांनी पाहिले.
बारामतीत भाजपनं अजित पवार यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिलीय. बारामतीसाठी नवख्या असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरु केल्यात. तर अजित पवार यांनी ४ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून राज्यभरात दौऱ्याला सुरुवात केलीय. त्यामुळे बारामतीत त्यांच्या पत्नी बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, भावजय शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार आणि पुत्र जय पवार यांनी प्रचाराची धुरा सांभाळलीय.