आनंदोत्सव | जय गणेश संस्था
एक सुगंधित सोहळा – मोगरा महोत्सव
चंदनाची वासंतिक उटी लावून श्री गणपती-मूर्तीची पूजा करणे ही या मंदिराची चालत आलेली पद्धत आहे. अस्सल चंदनाची पूड आणि खास म्हैसूरहून मागवलेली सुगंधी द्रव्ये यांच्यापासून ही उटी बनवली जाते.
श्री गणपतींच्या चांदीच्या मूर्तीला ही उटी लावली जाते. जवळजवळ दहा हजार मोगऱ्याची फुले या मूर्तीला वाहिली जातात. मंदिराचा सारा परिसरच चंदनाच्या आणि मोगऱ्याच्या फुलांच्या सुवासाने घमघमून जातो. ह्या ऋतूत विपुल प्रमाणात मोगऱ्याची फुलं मिळतात. त्यामुळे मंदिराचा गाभारा, भिंती, खांब आणि मंदिराचा कोपरान् कोपरा मोगऱ्याच्या फुलांनी सुशोभित केला जातो.
हा मधुर सुवास आणि शुभ्र पांढऱ्या फुलांच्या कलात्मक रचना यामुळे एक अद्भुत वातावरण तयार होते; आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक अलौकिक आनंद भरून राहातो. मंदिराला भेट देणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळावर इथले पुजारी चंदनाचा टिळा लावतात.
श्री गणपतींच्या पवित्र स्तोत्र-गायनाच्या व प्रार्थनांच्या सूर-तालांनी सबंध मंदिर भरून जाते. चंदनाची उटी आणि मोगऱ्याची हजारो फुले, तसेच जुई व चाफा यांसारखी सुवासिक फुले या सगळ्यांमुळे इथले वातावरण जणू स्वप्नवत् होऊन जाते. इथे येणारे भाविक पुणेकर नेहमीच या प्रसंगाची सुवासिक आठवण बरोबर घेऊन जातात आणि नंतरही ती मनात जपतात.
शहाळे महोत्सव
पुष्टीपती विनायक जयंतीचे औचित्य साधून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने दि. २९ एप्रिल २०१८ रोजी शहाळे महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान श्रींच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या ५००० शहाळ्यांचे वाटप दुसऱ्या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना करण्यात आले. दरवर्षी अशा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
आंबा महोत्सव
दरवर्षी अक्षयतृतियेला श्रीगणेशाला आंब्यांचा नैवेद्य दाखवला जातो. भारतात आंबा हे सर्वात लोकप्रिय फळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातला आंबा हा गुणवत्तेत आणि चवीत सर्वोत्तम समजला जातो आणि त्याला जगभरातून मागणी असते. किंबहुना हापूस आंब्याला फळांचा राजाच म्हटले जाते.
अक्षयतृतियेच्या दिवशी या सोनेरी-तांबूस रंगाच्या रसरशीत फळाला श्रीगणेशांच्या चरणी वाहिले जाण्याचा मान दिला जातो. पुण्यातील ’देसाई बंधू आंबेवाले’ हे आंब्यांचे अग्रेसर व्यापारी ११,००० आंब्यांचा भरघोस नैवेद्य श्रीगणेशांच्या चरणी अर्पण करतात. मंदिराचा परिसर पिकलेल्या, सोनेरी रंगाच्या आंब्यांनी भरून गेलेला असतो आणि त्या आंब्यांचा मंद सुवास कानाकोपऱ्यात भरून रहातो. मंदिराला भेट देणारे भक्त आणि माध्यमांचे कर्मचारी हे अद्भुत् दृश्य बघायला आणि आपल्या कॅमेऱ्यांमधे बंदिस्त करायला मोठ्या संख्येने हजर असतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात येणाऱ्या भक्तांना हजारो आंबे वाटले जातात.
गेल्यावर्षी ससून इस्पितळातल्या रुग्णांना आंबा-महोत्सवातले १४०० आंबे वाटण्यात आले.
युरोपमधे आंब्यांवर घातलेली बंदी उठवली जावी म्हणून ’देसाई बंधू आंबेवाले ’चे मालक श्री. मंदार व सौ. मैत्रेयी देसाई यांनी अभिषेक व गणेश-याग करून देवाला साकडे घातले. या प्रसंगी सिक्कीमचे राज्यपाल मा. श्रीनिवास पाटील यांची उपस्थिती हाही एक सन्मानाचा भाग होता. त्यांनी विनयाने उल्लेख केला की या मंदिराच्या बांधकामाच्या कामात त्यांचाही छोटासा सहभाग होता. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता मनापासून व्यक्त करताना आम्हालाही अतिशय आनंद वाटला.
संगीत महोत्सव
मंगलमूर्ती गणपती-मंदिराच्या वर्धापनदिनी संगीत-महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात आपली कला सादर करण्यासाठी दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी या दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार आमंत्रित केले जातात. (रामनवमीला महोत्सव संपतो.)
हा महोत्सव १९८४ मधे सुरू झाला. कोणतेही प्रवेश-शुल्क न आकारता सर्वांसाठी खुला असलेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती लाभलेला हा भारतातील एकमेव संगीत महोत्सव आहे.