मुंबई । सतिश शिंदे
देशातील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असताना सामाजिक भान राखून काम करणे आवश्यक असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज येथे व्यक्त केले.
द इकॉनॉमिक टाईम्स अवार्ड फॉर एक्सलन्स इन कॉरपोरेट एक्सलन्स या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन, रेल्वे मंत्री पीयुष गोयल आणि टाईम्स समूहाचे विनित जैन उपस्थित होते.
श्री. नायडू म्हणाले, गेल्या काही वर्षांत राज्यात अनेक महत्वपूर्ण आर्थिक घडामोडी घडल्या आहेत. देशाने सातत्याने प्रगती केली आहे. नोटाबंदी किंवा जीएसटी यासारख्या निर्णयाने आर्थिक शिस्त लावण्यात हातभार लागला आहे. परकीय गुंतवणूकीसाठी भारताला प्राधान्य देण्यात येते. लवकरच देश 10 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनण्यास सज्ज आहे. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येणारे 10 वर्ष हे देशासाठी महत्वाचे ठरणार आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर काम करणे आवश्यक ठरणार आहे. सत्या नडेला, सुंदर पिचाई, कल्याण कृष्णमूर्ती यांसारखी गुणवत्ता देशात उपलब्ध आहे. पायाभूत सुविधा, कृषी, शिक्षण, मानव संसाधन या सारख्या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत.
अर्थमंत्री श्री. जेटली म्हणाले, आपली अर्थव्यवस्था सक्षम असून याबाबत जाणकारांनी तसेच माध्यम प्रतिनिधींनी जबाबदारीने भूमिका बजवावी. देशात पहिल्यांदाच कर वसुलीत अमुलाग्र बदल दिसून आला आहे. स्वच्छ भारत ही एक घोषणा न राहता ग्रामीण भागात याला चळवळीचे स्वरुप आले आहे. सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था उभारण्याचे काम आज देशात झाले आहे. यात उद्योग जगताचा मोठा हातभार असल्याचेही त्यांनी सांगितले.
द इकॉनॉमिक टाईम्स अवार्ड फॉर एक्सलन्स इन कॉरपोरेट एक्सलन्स
या अंतर्गत देण्यात आलेले पुरस्कार
उद्योग क्षेत्रातील देदिप्यमान कामगिरीसाठी ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ या पुरस्काराने आदी गोदरेज यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
इज ऑफ डुईंग बिजनेस अंतर्गत राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी ‘बिजनेस रिफॉर्मर ऑफ द इअर’ हा पुरस्कार तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना प्रदान करण्यात आला.
‘एन्टरप्रेनर ऑफ द ईयर’ हा पुरस्कार पवन ऊर्जा क्षेत्रातील कार्याबद्दल सुमंत सिन्हा यांना श्री. गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला.
‘कॉर्पोरेट सिटीजन ऑफ द अवॉर्ड’ संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सितारामन यांच्या हस्ते हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला देण्यात आला.
‘ग्लोबल इंडियन ऑफ द ईयर’ हा पुरस्कार ॲडोब सॉफ्टवेअरच्या शंतनू नारायणन् यांना केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते देण्यात आला. उपराष्ट्रपती श्री. नायडू यांच्या हस्ते ‘इमर्जिंग कंपनी ऑफ द ईयर’ हा पुरस्कार पेज इंडस्ट्रीज यांना देण्यात आला.
· ‘पॉलिसी चेंज एजंट ऑफ द ईयर’ हा पुरस्कार ऑनलाइन पेमेंट सुविधा तयार करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन या कंपनीला देण्यात आला
· ‘कंपनी ऑफ द ईयर’ हा पुरस्कार बॅंकीग क्षेत्रातील अग्रणी समजली जाणारी एच डी एफ सी या बॅंकेने मिळविला.
· छोट्या स्टार्टअप्स उद्योगांना तसेच घरगुती उपकरण खरेदीला कर्ज देणारी बजाज फायनान्सच्या संजीव बजाज यांना ‘बिजनेस लिडर ऑफ द ईयर’ हा पुरस्कार देण्यात आला.