धुळे : लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केली होती. जमावाने केलेल्या मारहानीत पाचजणांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या त्या पाच जणांची आता ओळख पटली असून ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे समजत आहे. भारत शंकर भोसले, दादाराव शंकर भोसले, भारत शंकर माळवे, अंगु इंगोळे आणि राजु भोसले अशी मृतांची नावे आहेत. मृतांच्या नातेवाईकांनी मृतांचे मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत शवाला हात लावणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. मृत्यू झालेले पाचजण नाथगोसावी या भटक्या विमुक्त समाजाचे सदस्य असल्याचे समोर आले आहे.
नाथगोसावी समाजातील लोकांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदोलन छेडले असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्याचबरोबर काँग्रेस व आदी विरोधी पक्षांनी धुळे हत्याकांड प्रकरणी भाजपाला धारेवर धरले अाहे. पोलीस घटनास्थळी उपस्थीत असूनसुद्धा ते जमावाला रोखू शकले नाहीत असे म्हणत काँग्रेसने पोलीसांच्या निष्क्रीयतेचा निषेध केला आहे. “राज्यात कायद्याचे राज्य आहे की जंगल राज आहे?” असा सवाल उपस्थित करत काँग्रस नेते अशोक चव्हाण यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.