टीम, HELLO महाराष्ट्र | शिरपूर येथील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 15 ते 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटानंतर भीषण आग लागल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
या घटने बाबतची अधिक माहिती अशी की, शिरपूर शहराजवळ असलेल्या वाघाडी केमिकल फॅक्टरीत आज सकाळी दहाच्या सुमारास हा स्फोट झाला. त्यानंतर भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
हा स्फोट झाल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन, पोलिसांना तातडीने माहिती दिली. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाकडे जाण्यापासून नागरिकांना रोखलं आहे. केवळ बचाव पथकांनाच जाऊ दिलं जात आहे.
हा स्फोट नेमका कसा झाला आणि त्यामागचं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाही. पण स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की तो लांबपर्यंत ऐकायला गेला.
या स्फोटाने परिसर अक्षरश: हादरला. या कंपनीत नेमके किती कामगार होते याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान सध्या या फॅक्टरीला लागलेली आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जिल्ह्याचे पालक मंत्री दादा भुसे घटनास्थळी दाखल होण्यासाठी रवाना झाले आहेत. तर जिल्हाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.