गडचिरोली : भिमा कोरेगाव प्रकरणासंदर्भात मागील आठवड्यात पुणे पोलीसांनी पाच जणांना अटक केली होती. पुण्यामधे पार पडलेल्या एल्गार परिषदेला नक्षलवाद्यानी निधी पुरवला असल्याचा संशय पुणे पोलीसांनी व्यक्त केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमधे दलित लेखक सुधिर ढवळे, प्राध्यापिका शोमा सेन, अॅड. सुरेंन्द्र गडलिंग, रोना विल्सन आणि महेश राऊत आदींची नावे आहेत. यातील महेश राऊत यांनी यापूर्वी दोन वर्षे पंतप्रधान ग्रामविकास योजनेसाठी जिल्हा प्रशासनासमवेत काम केले आहे. महेश राऊतला अटक झाल्यानंतर ग्रामविकासमधे काम करणार्या ८० हून अधिक अधिकार्यांनी महेशच्या समर्थनार्थ एक पत्र लिहीले आहे. त्या सरकारी अधिकार्यांनी लिहिलेले व्हायरल पत्र खालीलप्रमाणे –
पंतप्रधान ग्रामविकासचे माजी फेलो (पीएमआरडीएफ) महेश राऊत यांना नागपूर येथून पोलिसांनी ‘यूएपीए’अंतर्गत अटक केल्याची बातमी वाचण्यास मिळाली. ‘यूएपीए’ कायद्यातील प्रखर कलमांचा वापर प्रामुख्याने गंभीर आणि देशविरोधी गुन्ह्यांसाठी होतो. म्हणूनच या कलमांतर्गत महेशला झालेली अटक आमच्यासह अनेक ‘पीएमआरडीएफ’ला धक्का देणारी आहे.
फेलो म्हणून महेश यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त जिल्ह्यात दोन वर्षे जिल्हा प्रशासनासोबत राहून काम केले. ‘पीएमआरडीएफ’ म्हणून आम्ही त्याचे काम जवळून पाहिले आहे. ज्या गावांमध्ये/क्षेत्रांमध्ये शासन पोचू शकले नाही, अशा ठिकाणी स्वातंत्र्यानंतर प्रथमच शासकीय शिबिरे आणि मेळावे घेत महेश यांनी स्थानिकांचा विश्वास राज्यघटना, शासन आणि शासकीय संस्थेत रुजविला आहे.
व्यवस्थेने दुरावलेल्या ग्रामस्तरावरील लोकांना निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी महेश काम करत असताना आम्ही पाहिले आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून सातत्याने काम करून महेश यांनी गावस्तरावरील लोकशाही संस्थानांना मजबूत करून लोकांचा विकासकार्यातील सहभाग वाढविला आहे. विकास किंवा प्रगतीचा खरा अर्थ लोकांच्या बाजूने उभे राहून लोकांच्या भल्यासाठी सामूहिकरित्या कायदा आणि घटनेच्या चौकटीत राहून काम करणे, असा असतो. लोकांसाठी सर्वस्व त्यागणारे महेशसारखे युवक या युगात क्वचितच आढळतात. न्यायालयाच्या निर्णयाआधीच महेशला नक्षलवाद्यांशी जोडण्याचे बेजबाबदारीचे काम प्रसिद्धीमाध्यमे करत आहेत. या आरोपांतून निर्दोष मुक्त होऊन महेश पुन्हा नव्या जोशाने लोकांसाठी काम सुरू करेल, अशी आम्हाला आशा आहे.