पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे
मागील २ वर्षांपासून १३ जणांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या ‘टी १ ‘ या पाच वर्षांच्या वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न फसल्यावर अखेर शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. मात्र या वाघिणीच्या मृत्यूवरुन सध्या मतभेद सुरु आहेत. त्यामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. तिला मारण्यासाठी हैदराबादचा नेमबाज नवाब शआफत अली खान याला पाचारण करण्यात आले होते. दीड महिना चाललेल्या या मोहिमेत वनखात्याने हत्ती, इटालियन कुत्रे, केल्विन क्ले असे पर्याय वापरूनही मात्र या पर्यायांना वाघिणीने दाद दिली नाही.
गेल्या आठ दिवसांपासून ‘युरीन थेरपी’ च्या सकारात्मक परिणामासह शुक्रवारी वाघीन बोराटी गावाजवळ गावकऱ्यांना दिसली. ती ” टी १” स्पष्ट होताच तिला वनखात्याने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला . ती उलट चाल करुन येत आहे समजताच नेमबाज नवाबचा मुलगा असगर याने तिला गोळी घालून ठार केले. वाघिणीला गोरेवाडा बचाव केंद्रात या दफन करण्यात आले. तिच्या मृत्यूनंतर तिच्या २ बछड्यानांही बेशुद्ध करुन जेरबंद करण्यासाठी वनखात्याची टीम पांढरकवडा येथेच तळ ठोकून आहे.