कोल्हापूर प्रतिनिधी | सतेज औंधकर
सद्या पाणी टंचाईची परिस्थिती प्रकर्षाने जाणवत असल्याने पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नळ धारकाने आपल्या नळांना तोट्या बसवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे. शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये, वाडी – वस्त्यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा 100 टक्के करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही घटकांकडून पाणी प्रदूषित करण्यामध्ये व पाण्याचा दुरुपयोग करण्यामध्ये वाढ होत आहे.
ग्रामीण भागात नळांना तोट्या न बसविलेने लाखो लिटर पाणी गटारीतून सांडपाण्याच्या स्वरूपात वाहून जात आहे. तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी उपसा करण्यासाठी वीज वापरावी लागते. या मुळे पाणी पुरवठा योजनांवर अतिरिक्त ताण वाढत आहे. सद्या पाणी टंचाईचा काळ असताना गावांमध्ये नळांना तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होऊन सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच कमी- जास्त दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
यावर नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेमार्फत पिण्याच्या पाण्याच्या नळांना तोट्या न बसविल्यास ५ हजार रूपये दंड व त्यानंतरही न बसविल्यास प्रती दिन २०० रूपये याप्रमाणे वैयक्तीत नळ धारकांना दंडात्मक कारवाई सुरु करण्याबाबत दिनांक 7 डिसेंबर 2018 च्या जिल्हा परिषद सर्व साधारण सभेमध्ये ठराव क्रमांक ५४८ मंजूर करणेत आलेला आहे. या दंडात्मक कारवाईमध्ये ठराव झाला असला तरी आचार संहिता असल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र १७ जून २०१९ पासून ग्रामपंचायत स्तरावर या ठरावाप्रमाणे दंडात्मक कारवाई सुरु केली जाणार आहे.
यासाठी दिनांक १४ जून २०१९ पर्यतं सर्व नळ धारकांनी आपल्या नळांना तोट्या बसविणे आवश्यक आहे . दि. १७ जून पासून ज्या नळांना तोट्या बसवल्या नसतील अशा नळ धारकांवर ठरावाप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तरी दंडात्मक कारवाई टाळणेसाठी सर्व नळधारकांनी नळांना तोट्या बसवण्याची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी व दंडात्मक कारवाई टाळावी असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.