गडचिरोली प्रतिनिधी । सर्वांनी दारूला नाही म्हणा, नव्या वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा असे आवाहन पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी तरुणाईला केले आहे. अभय बंग हे मुक्तिपथ संस्थेचे संस्थापक असून गडचिरोली जिल्ह्यात मुक्तीपथ अभियान राबविले जात आहे.
दारूच्या पहिल्या घोटापासूनच दूर रहा
अभय बंग यांनी म्हंटले की, नववर्षाची पहाट उंबरठ्यावर आली आहे. सर्वत्र जल्लोषपूर्ण वातावरण पसरायला लागले आहे. पण देशाचे भविष्य ज्या युवांच्या खांद्यावर आहे त्या तरुणाईला दारूच्या नशेत बेभान करून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची विकृत संस्कृती जन्म घेत आहे. ३१ डिसेंबरलाच अनेक युवक दारूचा पहिला घोट घेतात. पण थोडीशी गम्मत म्हणून घेतलेली दारू हळूहळू संपूर्ण शरीराचा ताबा घेते. यातूनच हिंसा, अत्याचार, अपघात अशा घटना जन्म घेतात. हे सर्व प्रकार टाळण्यासाठी दारूच्या पहिल्या घोटापासूनच युवांना दूर ठेवणे गरजेचे आहे.
तरुणाईला दारूपासून लांब ठेवण्यासाठी व्यापक मोहीम
गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ अभियान, पोलिस प्रशासन आणि गोंडवाना विद्यापीठाद्वारे व्यापक जंनजागृती मोहीम हाती घेतली असून ३१ डिसेंबरला सर्वांनी दारूला नाही म्हणा, नव्या वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा असे आवाहन मुक्तिपथचे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले आहे.