हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर आता धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. धनगर समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करुन आदिवासी समाजाच्या सवलती तातडीने लागू कराव्यात, अशी धनगर समाजाची मागणी आहे. या मागणीसाठी आज पंढरपुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ‘ढोल बजाव, सरकार जगाव’ हे आंदोलन करण्यात येत आहे.
ढोल वाजवून जर सरकारला जाग आली नाही, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन करणार, असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
धनगर आंदोलन राज्यभर विविध ठिकाणी होत आहे. राज्यभरातील ग्रामपंचायत, नगर पालिका , मंदिर , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होईल, अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. मी स्वतः पंढरपूर येथे आंदोलनात सहभागी होत आहे, असं पडळकर म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या धनगर समाजाला NT अंतर्गत आरक्षण आहे. मात्र धनगर समाजाने अनुसूचित जमातींमध्ये (ST) समावेश करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. “धनगर आरक्षणाचा मुद्दा हा राज्याच्या नाही तर केंद्राच्या अखत्यारित येतो. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा” अशी मागणी धनगर समाजाने सातत्याने केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’