सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
रब्बी हंगामातील पिक विमा, अवकाळीने नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई तात्काळ मिळावी, यांसह नगरपालिका, बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क अधिक्षक आदी ठिकाणी सुरु असणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, यासाठी जतचे माजी आमदार विलास राव जगताप यांनी कार्यकर्त्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी लाक्षणिक उपोषण केले .
मागील वर्षभरामध्ये अवर्षणामुळे रब्बी पीक वाया गेले त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. तसेच या वर्षी परतीच्या पावसाने रब्बी व बागायती पिकांचे प्रचंड नुकसान झाले, त्यांचे पंचनामे झाले, पण अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. यांसह अन्य अपूर्ण कामांच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यात आले. जत नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभाराबद्दल नगरसेवकांनी अनेक वेळा आंदोलने केली, टाळे ठोकले परंतु काहीही सुधारणा झालेली नाही. डेंगी, मलेरिया, यासह रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. अ
स्वच्छ व भ्रष्ट कारभाराचा अहवाल यापूर्वीच प्रशासनाला दिलेला आहे त्यावर कार्यवाही व्हावी, तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग व मुख्यमंत्री सडक योजनेतील कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्याची वालचंद कॉलेजच्या प्रयोगशाळेमार्फत आमच्या समक्ष तपासणी व्हावी, तपासणीमध्ये खडीची जाडी, डांबराच्या पावत्या व वापरलेले डांबर, साईड पट्टया यांचा समावेश करावा, या मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे.