रायपूर : पाकिस्तानच्या न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी देशाला धक्का देणारा निकाल सादर केल्याची घटना ताजी असताना काहीसा तसाच प्रकार भारतातील एका राज्यात होण्याचा सध्या संभव आहे. दोन दिवसांपूर्वी पनामा पेपर लीक घोटाळ्यात नवाज शरीफ आणि त्यांच्या मुलीला अनुक्रमे दहा आणि सात वर्षाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांच्या पुत्राचा पनामा पेपर घोटाळ्यात समावेश असल्याचा दावा छत्तीसगड काँग्रेसने केला आहे.
पनामा पेपर्स मध्ये इंटरनॅशनल कंसोर्शियम ऑफ इनवेस्टिगेटिव जर्नलिस्ट्स ने ज्या ‘अभिषेक सिंह’ चा उल्लेख केला आहे तो म्हणजे दुसरा कुणी नसून मुख्यमंत्री रमनसिंह यांचा पुत्र अभिषेक सिंह आहे असा आरोप छत्तीसगड काँग्रेसने केला आहे. आमच्याकडे यासंदर्भातले ठोस पुरावे असल्याचा दावा छत्तीसगड कॉग्रेस कमिटीने केला आहे.