परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून ऑक्टोबर महिन्यांमधील 21 तारखेला संपूर्ण राज्यांमध्ये एकाच दिवशी मतदान होणार आहे. पण मागील पंचवार्षिक मध्ये गावागावात जाऊन पाच वर्षात गाव व तालुक्याचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करण्याचे आश्वासन नेतेमंडळींनी दिले होते. सदरील आश्वासने हवेतच विरले गेल्याने , पाच वर्षानंतर विकासापासून दूर राहिल्याची भावना निर्माण झाल्याने जिल्ह्यातील काही गावांनी आता बहिष्काराचे शस्त्र हाती घेतले आहे .होऊ घातलेल्या निवडणूक प्रक्रियेवर व मतदानावर सोनपेठ तालुक्यातील सात गावातील तर जिंतूर व पाथरी तालुक्यातील प्रत्येकी एका गावाने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
जिंतुर तालुक्यातील आडगाव ग्रुप ग्रामपंचायत भुसकटवाडी आणि सोनपेठ तालुक्यातील गोदावरी काठच्या अकरा गावांचा पाथरी तालुक्यातील डोंगरगाव च्या रस्त्यांचा दळणवळणाचा गंभीर प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. थोडा पाऊस पडला की या गावांचा जिल्ह्याशी असणारा संपर्क तुटतो. त्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होतात. नुकत्याच झालेल्या पावसाने सोनपेठ तालूक्यातील गोदाकाठच्या गावांना जोडणारे दोन्हीही रस्ते ठप्प झाल्याने या गावातील विद्यार्थ्यांची शाळा आठ दिवस बंद होती. गरोदर स्त्रिया व रुग्णांचे मोठे हाल झाले. यामुळे त्रस्त झालेल्या गोदाकाठच्या लोकांनी दि. 26 रोजी थडी उक्कडगावा सह येथे सात गावातील नागरिकांची महापंचयात आयोजित केली होती.
या महापंचायतीत गोदाकाठच्या गावांनी निवडणुकीवर संपूर्ण बहिष्कार टाकून मतदान न करण्याचे निर्णय घेतला आहे. तसेच शासकीय अधिकारी व राजकीय पदाधिकारी याना गावबंदी करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
या महापंचायतीस लासीना, थडी उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगा पिंपरी,भुसकट वाडी लोहिग्राम, गोळेगाव, यासह गोदाकाठच्या गावातील नागरिक सरपंच, उपसरपंच, चेअरमन, माजी सरपंच यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक महिला युवक व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशाच प्रकारे पाथरी तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामस्थांनी सभा घेत या आठवड्यातील सोमवारी पाथरी तहसीलदारांना बहिष्कारा संदर्भातील ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन दिले आहे.
लोकसभेच्या वेळेसही जिल्हात बऱ्याच गावातील ग्रामपंचायतीने मतदानावर बहिष्काराचे शस्त्र काढले होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने गावकर्यांची समजूत काढून त्यांना मतदान करण्यास राजी करण्यात आलं होतं. त्या वेळी ग्रामस्थांनी पिक विमा भेटला नसल्याचे कारण देत बहिष्कार टाकण्याचा सत्र सुरू केलं होतं . ती मागणी आज पर्यंत पूर्ण झाली नाही .आता गावातील रस्त्यांचा संदर्भात ग्रामस्थांनी बहिष्काराचे शस्त्र उपसले असले तरी प्रशासन या ग्रामस्थांची कशी समजूत काढते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.