कोल्हापूर प्रतिनिधी । कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून काही प्रगती होत नसल्याने हा तपास यंत्रणेकडून तपास काढून घ्यावा अशी मागणी पानसारे यांच्या कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टाकडे केली आहे. याबाबात रितसर अर्ज करून ही मागणी कोर्टापुढे मांडण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येत वापरलेल्या हत्याराचे अवशेष खाडीतून शोधण्यासाठी सीबीआयला आणखी दोन आठवडे आहेत. राज्य सरकारच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) कॉ.पानसरे हत्येचा तर सीबीआयकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास सुरू आहे. मात्र, तपास धिम्या गतीने होत असल्याचा आरोप करणाऱ्या दोन्ही कुटुंबांच्या याचिकांच्या निमित्ताने उच्च न्यायालयाने या प्रश्नावर देखरेख सुरू ठेवली आहे.
‘कोल्हापूर परिसरात उद्भवलेली पूरपरिस्थिती आणि होत असलेला पाऊस या कारणांमुळेच आम्ही यासंदर्भात कोणताही कठोर आदेश काढणे तूर्तास टाळत आहोत. मात्र, यासंदर्भात आम्हाला नापसंती दर्शवावी लागेल. तुमच्या तपासात प्रगती दिसत नाही. पुढच्या वेळी तरी प्रगती दाखवाल, अशी आम्हाला आशा आहे’, अशा शब्दांत न्यायालयाने महाराष्ट्र एसआयटीला मागील सुनावणीच्या वेळी खडे बोल सुनावले होते.