कोल्हापूर प्रतिनिधी| पुरग्रस्त मदत वाटप सुरू असताना यादीत नाव घालण्यावरून दोन कुटुंबात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीमध्ये ८ जण जखमी झाले आहेत. जखमींना कोल्हापूर शहरातील सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडणगे येथे घडली आहे.
जिल्हयातील पूरग्रस्तांना विविध सेवा भावी संस्था, व्यक्ती, तरूण मंडळांकडून मदत वाटप केली जात आहे. करवीर तालुक्यातील वडणगे गावालाही महापुराचा फटका बसला होता. चर्च जवळील असणाऱ्या एका वसाहतीतील पूरग्रस्तांना मदत देण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी आकाश भालेकर आणि ज्ञानू भालेकर यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. यामध्ये आकाश भालेकर, शिवाजनी भालेकर, याकूब भालेकर आणि राणी दाभाडे या एका गटाचे तर दुसर्या गटाचे ज्ञानू भालेकर, अनिल भालेकर, जायनाबाई भालेकर आणि आकाश भालेकर असे दोन्ही गटाचे मिळून एकूण आठ जण जखमी झाले आहेत. या सर्वाना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात 13 जणांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.