औरंगाबाद प्रतिनिधी । नाकाबंदी सुरु असताना कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी थांबण्याचा इशारा केल्यानंतरही त्याला न जुमानता रिक्षा पोलिसांच्या अंगावर घालत सरकारी कामात अडथळा निर्माण करणारा रिक्षाचालक कुणाल प्रदीप सोनकांबळे याला दोन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार ३०० रुपयांचा दंड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी ठोठावला.
याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्याचे तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक गणेश ढोकरट यांनी फिर्याद दिली होती. सप्टेंबर २०१४ मध्ये सकाळी नऊपर्यंत ढोकरट हे रात्रपाळीच्या कर्तव्यावर होते. रात्री साडेदहाच्या सुमारास कंट्रोल रुमने परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ढोकरट व त्यांच्या सहाकऱ्यांनी गजानन महाराज चौकात नाकाबंदी केली होती. त्यावेळी आरोपी रिक्षाचालक कुणाल प्रदीप सोनकांबळे हा अॅपेरिक्षा घेऊन तिथे आला. ढोकरट यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला, परंतु आरोपीने ढोकरट यांचा इशाऱ्याला न जुमानता रिक्षा भरधाव नेली.
योगश खाडे नावाच्या तरुणाने ढोकरट यांना दुचाकीवर घेत पाठलाग करून रिक्षा गाठली. रिक्षाला ओव्हरटेक करून दुचाकी रिक्षासमोर लावली मात्र आरोपीने रिक्षा त्यांच्या अंगावर घालून त्यांना जखमी केले व तेथून रिक्षासह धूम ठोकली. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.