नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
‘फनी’ वादळामुळे वातावरणात गारवा नाशिक ऐन उन्हाळ्यात शहरातील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या खाली आल्याने शहरातील उकाडा कमी होऊन आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णता कमी होत असून ‘फनी’ वादळाचा हा परिणाम आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. आठ दिवसांपूर्वी वातावरणात प्रचंड उष्णता होती. नाशिक शहराच्या तापमानाने चाळिशी पार केली होती.
२८ एप्रिल रोजी शहरातील तापमान ४२.८ अंशांपर्यंत पोहचले होते. उन्हामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने उघड्यावर रहाणाऱ्यांना जीवन जगणे मुश्कील झाले होते. नाशिकमध्ये दहा वर्षांनंतर ४२.८ तापमानाची नोंद झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमान कमी होऊ लागले आहे.
दुपारी उष्णता, रात्री आणि सकाळी गारवा यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सकाळी व संध्याकाळी जॉगिंग ट्रॅकवर फिरणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आगामी काही दिवस उत्तर महाराष्ट्रातील तापमान असेच राहील. वादळाचा जोर ओसरताच पुन्हा पारा चढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.