पुणे प्रतिनिधी। राज्यातील बहुचर्चित राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुन्हा दाखल केलाआहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. पवारांवर दाखल केलेला गुन्हा हा राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचा आरोप करत बारामती बंदची हाक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत बारामती शहरात बंद पाळण्यात आला.
व्यवहार उत्स्फूर्तपणे बंद ठेवून या कारवाईचा बारामतीकरांनी निषेध केला. बारामती शहरातील बंदच्या पार्श्वभूमीवर बारामतीत अतिशय कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. बारामतीचे बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची उपस्थिती दिसत आहे. आज बारामतीकरांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी होत आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. मात्र औषधांची दुकाने दवाखाने यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू आहेत.
आज ठिकठिकाणी लोक एकत्र जमून या कारवाई संदर्भात चर्चा करताना दिसत आहेत. आचारसंहिता सुरू असल्यामुळे तसेच 144 कलम लागू केल्याने निषेध सभेचे आयोजन रद्द केल्याचे काही ज्येष्ठ मंडळींनी सांगितले. दरम्यान बारामतीत तणावपूर्ण शांतता जाणवत होती.