सोलापूर प्रतिनिधी। सोलापूरमधील बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिपूर रोडवरील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात हा हादरवणारा प्रकार घडलाय. मृतांमध्ये पती, पत्नी, अल्पवयीन मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबीयांसहीत आत्महत्या केली. भरदिवसा ही घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे.
आपल्या दोन्ही लहान मुलांना विष पाजून त्यानंतर कोकाटे दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये. पण यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. भैरवनाथ कोकाटे, मनिषा भैरवनाथ कोकाटे, प्रशांत कोकाटे आणि प्रतीक्षा कोकाटे अशी मृतांची नावं आहेत. या घटनेमुळ संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, बुलडाण्यामध्ये सोमवारी एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली. बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील माळेगाव इथं हा प्रकार घडला. आईसह ४ मुलींचा मृतदेह विहिरीत आढळला होता. या गंभीर प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. गावातील एका विहिरीमध्ये हे 5 मृतदेह आढळले आहेत.