बार्शी : काळ पुढे जाताना स्वतःत बदल करत जात असतो असे म्हणले जाते. त्याचाच प्रत्यय काल सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत आला आहे. २५वर्ष बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीवर ज्यांनी राज्य केले त्या आमदार दिलीप सोपल यांची राजवट बाजार समितीत संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोपल गटाला ७, भाजपच्या राऊत गटाला ९, तर मिरगणे गटाला २ जागी विजय मिळाला आहे. विशेष चुरशीच्या तीन लढतीत निकाल अनपेक्षित लागले आहेत. उक्कडगाव गणातून दिलीप सोपलांचे पुतणे पराभूत झाले असून जामगाव गणातून राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत सर्वाधिक मताने विजयी झाले आहेत. तर शेळगाव गणात शिक्षण सम्राट बाळासाहेब कोरके आणि उद्योगपती राजेंद्र मिरगणे यांच्यात चुरशीची लढत होईल असे मानले जात असताना दोघांचाही पराभव घडवत राऊत गटाने बाजी मारली आहे.
आ.दिलीप सोपल यांनी २५ वर्षाच्या राजवटीत बाजार समितीच्या कारभरावर वचक ठेवला. गेल्या निवडणुकीत भाऊसाहेब आंधळकर यांनी अल्प प्रमाणात लढत देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु राजेंद्र राऊत त्या निवडणुकीत तटस्थ राहिल्याने निवडणुकीत सोपल विजयी ठरले. यावेळी सोपल यांना अस्मान दाखवण्यासाठी राऊत यांनी जंग जंग पछाडले आणि विजयश्री खेचून आणला.