यवतमाळ प्रतिनिधी | वाळू तस्कर किती बेलगाम झाले आहेत याचा प्रत्यय यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे आला. वाळूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच घाटंजी तहसीलचे तलाठी अनंत चवडे आणि नायब तहसीलदार मिरगणे आदी कर्मचाऱ्यांनी धाव घेत वाळूचा ट्रॅक्टर अडवून वाळू वाहतूक करणाऱ्यांना वाहतुकीचा परवाना मागितला. अधिकाऱ्यांच्या विचारणेला प्रतिसाद न देता वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांनी भर रस्त्यात ट्रॅक्टरमधली वाळू ओतून दिली. सोबतच प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत भरधाव वेगाने ट्रॅक्टर घेऊन घटनास्थळावरुन निघून गेले. दरम्यान अधिकाऱ्यांकडून ट्रॅक्टर मालका विरुद्ध पोलिसांत तक्रार केली गेली आहे.