टीम, HELLO महाराष्ट्र | केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या सदस्यांची संख्या आता १८ कोटींवर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात ११ कोटींवर असलेल्या भाजपच्या सदस्यसंख्येत ऑनलाइन आणि ऑफलाइन मिळून अवघ्या दीड महिन्यात सात कोटी नव्या सदस्यांची भर पडली असल्याचा दावा गुरुवारी भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी पत्रकार परिषदेत केला.
भाजपच्या पक्षघटनेनुसार आधीच्या सदस्यसंख्येपेक्षा २० टक्के नवे सदस्य जोडणे बंधनकारक असते. सदस्यता मोहीम हाती घेण्यापूर्वी भाजपची ११ कोटी सदस्यसंख्या होती. त्यानुसार दोन कोटी २० लाख नवे सदस्य सामील करायचे होते. पण भाजपची आतापर्यंत ऑनलाइन सदस्यसंख्या पाच कोटी ८१ लाख ३४ हजार २४२ झाली आहे, तर ऑफलाइन अर्ज भरुन ६२ लाख ३५ हजार ९६७ नवे सदस्य बनले आहेत.
दरम्यान भाजपच्या सदस्यत्व मोहिमेला प्रारंभ ६ जुलै रोजी वाराणसीहून झाला होता आणि याचा समारोप २० ऑगस्ट रोजी झाला. अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक अडथळ्यांमुळे ही मोहीम अवघ्या सहा आठवड्यांमध्ये थांबवावी लागूनही त्यात सात कोटी नव्या सदस्यांची भर पडल्याचा दावा नड्डा यांनी केला.