टीम, HELLO महाराष्ट्र| वेगवान धावपटूचा विचार करताच सर्वात आधी डोळ्यासमोर नाव येतं ते उसेन बोल्ट याचं. भारतात आजपर्यंत असा उसेन बोल्ट सध्या तरी नाही. परंतु, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा तरुण भारताचा उसेन बोल्ट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील तरुण धावपटू रामेश्वरने १०० मीटरचे अंतर अवघ्या ११ सेकंदात पार केल्याचा दावा केला जात आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी या मुलाला आपल्याकडे पाठवण्याचे सांगितले आहे.
केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर भारतीय खेळ प्राधिकरण (साई) ने रामेश्वरला तत्काळ भोपाळ येथील साई सेंटरला येण्यास सांगितले आहे. या व्हिडिओत हा तरुण चप्पल-बूटविना धावताना दिसत आहे. १०० मीटरचं अंतर केवळ ११ सेकंदात त्यानं पूर्ण केलं आहे.