शिर्डी | सतिश शिंदे
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या ५० स्मृती स्थळांचा विकास करणार असून हरेगाव येथील डॉ.बाबासाहेबांचे स्मारक नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरेल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे केले.
श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनप्रसंगी श्री.बडोले बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार दिलीप गांधी, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, पंचायत समिती सभापती दीपक पटारे, हरेगावच्या सरपंच अनिता भालेराव, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे, प्रकाश चित्ते, देविदास कोकाटे आदी उपस्थित होते.
श्री. बडोले म्हणाले, भारतीय समाज व्यवस्थेत डॉ. बाबासाहेबांमुळेच दलित, आदिवासी, शोषित आणि महिला यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. अशा महामानवाचे भव्य स्मारक उभारले जात आहे, हे स्मारक आपल्याला कायम प्रेरणा देत राहील. भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त डॉ. बाबासाहेबांचे जीवनाशी निगडित व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ५० स्मृती स्थळांचा विकास करण्याचे नियोजन शासनाने केले आहे. त्यातील २८ स्मृती स्थळांचे काम सुरु आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकाला सहकार्य करण्याचे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे स्पष्ट करून हरेगाव येथील घरकुल योजना, बेरोजगारीचा प्रश्न यासह विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लवकरच बैठक घेणार असल्याने त्यांनी सांगितले.
श्री.कांबळे यांनी हरेगाव येथील स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगितले.
यावेळी श्री.गांधी, श्री. वाकचौरे, आमदार श्री. कांबळे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त पांडुरंग वाबळे यांनी केले.