पुणे : आपल्या बेताल वक्तव्याने सतत चर्चेत राहणारे आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संशयित असलेले संभाजी भिडे गुरुजी यांनी पुन्हाएकदा वादग्रस्त विधान केले आहे. रविवारी पुण्यातील जंगली महाराज मंदिरात भाषण देत असताना “मनू सर्व संतांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे त्यांनी म्हणले आहे. आता गृहविभागा कडून तपासण्यात येणार आहे.
शनिवारी ७ जुलै रोजी पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात भिडे गुरुजींनी दिलेल्या भाषणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पेक्षा मनु श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य भिडे गुरुजीनी केले होते. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अाज विधानसभेत भिडे गुरुजींच्या मुद्यावर घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. त्याला उत्तर देताना ‘भिडे गुरुजींचे जंगली महाराज मंदिरातील भाषण आम्ही तपासू आणि भिडे गुरुजी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू” असे मुख्यमंत्र्यानी जाहीर केले. यासंदर्भात सरकारने आपली भुमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी केली असता, ‘आम्ही मनूचा कदापि पुरस्कार करणार नाही’ असे फडणवीसांनी सांगीतले.