कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मध्यस्ती करण्याची विनंती छत्रपती संभाजीराजे भोसले यांना सर्व स्तरातून केली जात होती. त्यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे हे मी शिवशाहू महाराष्ट्र दौरा काढून समजुन घेतला आहे. २०११ पासून मी आरक्षणाच्या लढाईत समाजासोबत आहे असे संभाजीराजे म्हणाले.
‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना भेटण्याची माझी इच्छा नाही. परंतु आपण प्रत्येक जिल्ह्यातून पाच आणि प्रत्येक तालुक्यातून दोन प्रतिनिधी म्हणून चर्चेला आलात तर ही चर्चा खऱ्या अर्थाने पार दर्शक होईल’ असे संभाजीराजे म्हणाले. ही चर्चा कोणत्याही प्रकारे बंद खोलीत केली जाऊ नये, ती सर्वोतोपरी खुली झाली पाहिजे आणि सर्वत्र प्रसारित केली पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मराठा समाज आक्रमक होत असताना आत्महत्या करतो आहे हे अत्यंत चुकीचे आणि दुःखदायक आहे असेही संभाजी राजे म्हणाले.