नाशिक | अमित येवले
मांगीतुंगी येथे विश्वशांती अहिंसा संमेलनाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद, राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना राष्ट्रपती राम नाथ कोविन्द म्हणालेत, अहिंसेच्या माध्यमातून शांती आणि शांततेच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश भगवान ऋषभदेव यांनी दिला. जगातील सद्यस्थिती पाहता त्यांचा अहिंसेचा संदेश आजही प्रासंगिक आणि अनुकरणीय आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि महापुरुषांची भूमी आहे. या राज्याने सामाजिक समरसतेचा संदेश देशाला दिला आहे. त्यात नाशिक ही पावनभूमी असून धार्मिक पर्यटनासाठी अत्यंत महत्वाची आहे. राज्य शासनाची जनकल्याणाच्या भूमिकेतून गेल्या चार वर्षात चांगली कामगिरी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यावेळी आपले विचार मांडलेत ते म्हणालेत, भगवान ऋषभदेव हे आदर्श शासक होते. करुणा आणि अहिंसेचा मंत्र त्यांनी दिला. त्यांच्या माध्यमातून जगाला कल्याणकारी मूल्यांना समर्पित करण्याचे कार्य प्राप्त झाले. त्यांच्या या १०८ फुटाच्या अतिभव्य मूर्तीच्या दर्शनाने मूल्यविचारांची प्रेरणा मिळते. मांगीतुंगी परिसर विकासासाठी राज्य शासनाचे नियोजन असून विविध कामांना मंजूरी आतापर्यंत देण्यात आली असून ५५ कोटींची विकासकामेही पूर्ण केली आहेत. मांगीतुंगी परिसर विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.