नवी दिल्ली । मुंबईत कांदिवलीमध्ये शुक्रवारी शिवसेना कार्यकर्त्यांनी नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. या घटनेचे पडसाद देश पातळीवर उमटत आहेत. आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणाची दखल घेत गंभीर इशारा दिला आहे. सैन्यातील माजी अधिकाऱ्यावर झालेला हा हल्ला खेदजनक आहे. आणि असे हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाही असं राजनाथ सिंहांनी म्हटलं आहे.
माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या घटनेची दखल घेत राजनाथ सिंह यांनी मदन शर्मा यांना फोन केला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राजनाथसिंह यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ‘काही गुंडांनी माजी अधिकाऱ्याला मारहाण केली. यासंदर्भात अधिकाऱ्याला फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच सैन्यातील माजी अधिकाऱ्यावर झालेला हा हल्ला खेदजनक आहे. आणि असे हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नाही’, असा इशारा राजनाथ सिंह यांनी ट्विट करत दिला.
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
शुक्रवारी (11 सप्टेंबर) निवृत्त नौदल अधिकारी असलेले 62 वर्षीय मदन शर्मा यांना काही शिवसैनिकांनी मारहाण केली होती. मदन शर्मा यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतच एक व्यंगचित्र व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केलं होतं. याच रागातून काही शिवसैनिक त्यांन्या घरी गेले आणि त्यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मारहाणीची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 325 आणि दंगलीशी संबंधित तरतुदींअंतर्गत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्यात आली. परंतु त्यानंतर अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांची जामीनावर सुटका झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.