मारहाण आणि खंडणी प्रकरणी उदयनराजे निर्दोष; सातारा सत्र न्यायालयाचा निकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांना सातारा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे लोणंद येथील सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण आणि त्यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल खटल्यात सातारा सत्र न्यायालयाने उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांना निर्दोष ठरवलं आहे.

उदयनराजे भोसले यांच्यासह 12 जणांवर सोना अलायन्स कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना मारहाण केल्याचा आणि 24 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप होता. त्यानंतर राजकुमार जैन यांनी 23 मार्च 2017 रोजी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान या प्रकरणात मध्यंतरीच्या काळात उदयनराजेंच्या अडचणी वाढल्याचंही बोललं गेलं. मात्र, सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने यावर निकाल सुनावत आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

काय आहे प्रकरण?

सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे सोना अलायन्स नावाची लोखंडाच्या भुकटीपासून विटा तयार करणारी कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली कामगारांची संघटना आहे. उदयनराजे भोसलेंनी 18 फेब्रुवारी रोजी कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून खंडणीची मागणी केली आणि बेदम मारहाण केली, असा आरोप जैन यांनी केला. या प्रकरणी त्यांनी पोलीस तक्रारही दिली. या तक्रारीनुसार उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात उदयनराजेंसह 9 जणांना 2017 मध्ये अटकही झाली होती.

उदयनराजे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे उदयनराजेंच्या अडचणी वाढल्या होत्या.