मुंबई प्रतिनिधी। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे मास्टर माईंड असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर स्वतः जाऊन आपल्या गुन्ह्या बद्दल ईडीला माहिती देऊन तपासात सहकार्य करणार असे शरद पवार यांनी म्हणले होते. त्यानुसार ते आज दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात जाणार देखील होते. मात्र त्यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे.
शरद पवार ईडीच्या कार्यलयात जाणार असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत ईडीच्या कार्यालयाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी ईडीच्या कार्यालयाला कलम १४४ लावले. शांततेच्या कारणावरून एकाद्या परिक्षेत्राला कलम १४४ लावण्याचा गृह विभागाला अधिकार आहे. या कलमानुसार ठरवून दिलेल्या जागेत संचारबंदी लागू असते. अर्थात दोन पेक्षा अधिक व्यक्ती या परिसरात एकत्रित येऊ शकत नाहीत.
ईडीच्या कार्यालयाला कलम १४४ लागू असल्याने आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी शरद पवार यांना तुम्ही ईडीच्या कार्यालयात जाऊ नका अशी विनंती केली. तुम्ही ईडीच्या कार्यालयात गेल्यास परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाईल त्यामुळे तेथे हिंसाचार भडकेल. पुढील अनर्थ टाळण्यासाठी आपण ईडीच्या कार्यालयात जाऊ नये अशी विनंती शरद पवारांना पोलिसांनी केली. त्यानंतर पोलिसांच्या विनंतीचा मान राखत शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा आपला निर्णय मागे घेतला.