मुंबई प्रतिनिधी | भाजपने आपण सरकार स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यानंतर राजकीय चक्रे वेगवान करत शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.
त्यामुळे भाजपमधील आमदारांच्या गोटात खळबळ सुरु झाली असून भाजपला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण भाजपच्या 7 आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केल्याची माहिती एका मराठी वृत्त वाहिनीने प्रसारित केली आहे. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान फोन करणाऱ्या या सात आमदारांपैकी 2 सातारा जिल्ह्यातील तर एक आमदार पुणे जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. आम्ही राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असून वाटल्यास आम्ही राजीनामाही देतो असं या आमदारांनी सांगितलं असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी भाजोप शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यावेळी भाजपने मेगाभरती सुरु केली होती. परंतु आता सत्तेची चक्रे उलटी फिरल्याने या आमदारांची चांगलीच पंचाईत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सर्वसाधारणपणे अपक्ष आमदार सत्तेच्या बाजूने उभं राहण्याचा निर्णय घेतात. आता राज्यात सत्तेचं समीकरणच बदलत असल्याने आधी पाठिंबा दिलेले आमदारही भाजपला धक्का देत काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडे जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.