रत्नागिरी प्रतिनिधी । महाराष्ट्राप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबला होता. पाऊस गेला तरीही थंडी नव्हती. दरम्यान जानेवारीच्या पहिल्याच दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दापोलीत पारा ९ अंशापर्यंत खाली घसरला आहे. मात्र पुन्हा वातावरणात झालेल्या बदलांमुळे गुलाबी थंडी गायब झाली. बुधवारपासून (ता.१५) पारा १२ ते १४ अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणातील थंडीमुळे आंबा बागायतदारांना सुगीचे दिवस अपेक्षित आहेत.
डिसेम्बरमध्ये थंडी नसल्याने आंबा बागायतदार निराश झाले होते. काही ठिकाणी मोहोर आला तरी ते प्रमाण अवघे १० टक्केच होते. १ ते ५ जानेवारीपर्यंत हलकी थंडी होती; मात्र पुन्हा वातावरणात बदल झाले आणि पारा २३ अंशावर आला. अधूनमधून थंडी जाणवत होती. पण ढगाळ वातावरणही होते. बुधवारी सकाळपासून हवेत गारवा होता. सायंकाळी रत्नागिरीत पारा घसरु लागला आहे.