HELLO महाराष्ट्र | अवकाळी पावसामुळे राज्यात आणि देशात इतरत्रही अनेक पिकांचे नुकसान झालं आहे. कांद्याच्या पिकांवरही पावसाने पाणी फेरल्याने सध्या त्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. गेल्या आठवड्यात अनेक शहरांत कांद्याचे भाव ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. मंगळवारी विविध शहरांमध्ये कांद्याचे भाव ६० ते ८० रुपये किलो होते.
येत्या काही दिवसांत कांद्याचे भाव कमी होतील असा सरकारचा दावा आहे. पण तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की पुरवठ्याला विलंब होत असल्याने पुढील किमान एक महिनाभर तरी कांद्याचे दर चढेच राहतील. सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ८०-९० रुपये प्रति किलो आहेत. ऑक्टोबर महिन्यात ५५ रुपयांपर्यंत असलेले कांद्याचे भाव आता ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
अलवर आणि नाशिक येथून होणारी कांद्याची आवक विशेषत: कांद्याचे दर ठरवते. आझादपूर बाजारात सोमवारी कांद्याची आवक कमी होती. मंगळवारी ती थोडी वाढल्याने कांद्याचे दर काहीसे स्थिर होते. दरम्यान देशभरात कांद्याचे भाव वाढत असल्याने सरकारही अलर्ट झालं आहे. अनेक ठिकाणी कांद्याच्या भावाने शंभरी गाठली आहे. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने मंगळवारी बैठक घेतली. कांद्याची आवक वाढवण्याच्या पर्यायांवर यावेळी विचार झाला.