अमरावती : आमदार बच्चू कडू आणि अधिकारी यांच्यातील वैर बच्चू कडू मंत्री झाल्यानंतर देखील कायम राहणार असल्याचे संकेत मंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. मंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तहसील कार्यालयाला भेट दिली. त्यावेळेस त्यांना तहसीलदारांचा भोंगळ कार्यभार निदर्शनास आला. संजय गांधी निराधार योजनेत हलगर्जीपणा केल्यामुळे निरीक्षण अधिकारी सपना भोवते आणि नागरिकांना राशन कार्ड न दिल्याने नायब तहसीलदार (पुरवठा) प्रमोद काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले आहेत.
बच्चू कडू यांनी ३० डिसेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्री पदाची शपतथ घेतली आहे. एकीकडे खातेवाटपाचा वाद सुरु असताना बच्चू कडू मात्र ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून सलग चार वेळेस ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या हटके आंदोलनासाठी ते प्रसिद्ध आहेत. विशेषतः अधिकारी वर्गाशी ते कायमच दोन हात करत आले आहेत. आता मंत्री झाल्यानंतर देखील त्यांनी निष्काळजी, बेजबाबदार अधिकारी वर्गावर निशाणा साधला आहे.