मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हंटले की, साखरे संदर्भातील एका कार्यक्रमात हे म्हणतात की, साखरेचा विषय आला की मी जयंत पाटलांकडे पाहतो. महसूलचा विषय आला की मी बाळासाहेब थोरातांकडे पाहतो. मग तुम्ही काय करता. केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात का आणि राज्याला असा मुख्यमंत्री चालणार आहे का,’अशी बोचरी टीका करत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
बांध काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळत नाही
राज्यात अवेळी पावसाने ९४ लाख हेक्टरचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तुम्ही काय नुकसान भरपाई दिली, असा सवाल करत पाटील यांनी ठाकरेंना लक्ष्य केले. अवेळी पावसाच्यावेळी ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते हा धागा पकडत पाटील म्हणाले, बांध काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. एकर, हेक्टर हे कळत नाही. हेक्टर म्हणजे काय ते पहिले सांगा, एका हेक्टरमध्ये किती एकर, एका एकरात किती गुंठे आणि एका गुंठ्यात किती चौरस फूट जागा येते, याची माहिती सांगा. ‘एमएसपी’,‘एफआरपी’ म्हणजे काय हेही कळत नसून यांना कशाचीही उत्तरे माहिती नाही, अशी खोचक टीका त्यांनी ठाकरेंवर केली.