वाशीम प्रतिनिधी | चालू वर्षीच्या पावसाळ्यात रिमझिम स्वरूपात का होईना पाऊस झाल्यान खरीप हंगामातील पिकांची स्थिती समाधानकारक आहे. मात्र दमदार पावसाअभावी धरणांच्या पाणी पातळीत अद्यापपर्यंत अपेक्षित वाढ झालेली नाही. यंदा सरासरी पेक्षा पाऊस कमी झाल्यामुळं वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 44 टक्केच जलसाठा आहे. त्यामुळं शहरात पाणी कपात केली जात आहे. मात्र वाशिम शहरातील देवपेठ इथं २ दिवसापासून नगर परिषद नळ योजनेचे पाईप लिकेज झाल्यानं हजारो लिटर पाणी वाया जातय. त्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.
जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ धरणांमध्ये केवळ १८.८६ टक्के जलसाठा गोळा झाला. यात वाशिमच्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पात ४१.८५, मालेगाव तालुक्यातील सोनलमध्ये १३.८९; तर कारंजा तालुक्यातील सोनल प्रकल्पात जेमतेम ७.९९ टक्के जलसाठा गोळा झाला आहे. याशिवाय वाशिम तालुक्यातील ३५ लघू प्रकल्पांमध्ये ३५.६३, परिसस्थितीत मालेगाव तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये १५.२८, रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांमध्ये १४.१४, मंगरूळपीर तालुक्यातील १५ प्रकल्पांमध्ये १०.३५, मानोरा तालुक्यातील २४ प्रकल्पांमध्ये १६.०३; तर कारंजा तालुक्यातील १६ लघूप्रकल्पांमध्ये १९.९३ असा सरासरी २०.४१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये संततधार तथा मोठ्या स्वरूपातील पावसान हजेरी न लावल्यास आणि धरण तुडूंब न भरल्यास आगामी रब्बी हंगामातील पिकांना सिंचनासाठी पाणी पुरविणे कदापि शक्य होणार नाही. यासोबतच पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्याव लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.