मुंबई प्रतिनिधी । ‘मुख्यमंत्री कार्यालयातून शिवस्मारकाचे एलएनटीला काम देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. सरकारची सर्व कामे एलएनटीला का मिळत आहेत.?? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात कॅगने आक्षेप घेतला असून मंत्रालयाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्या’चा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई विभागीय अध्यक्ष नवाब मलिक यांनी केला आहे.
शिवस्मारकाच्या कामकाजावरून राष्ट्रवादीने पुन्हा एकदा सरकार ला धारेवर धरले आहे. कॅग च्या अहवालावरून राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारले आहेत.
‘प्रस्तावित शिवस्मारकातील तलवारीची उंची वाढली, स्मारकाचे क्षेत्रफळ कमी केले आणि १,३०० कोटी कमी झाल्याचे चित्र उभे केले गेले. अशा प्रकारे राज्यात होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा अहवाल कॅगने दिलाय’ याबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा असे आव्हान नवाब मलिक यांनी दिले आहे.