कोल्हापूर प्रतिनिधी |सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी डबे घेत मदत मागितल्या प्रकरणी खासदार संभाजीराजे आणि तावडे यांच्यातील वाद बुधवारी आणखीनच पेटला आहे. संभाजीराजेंना तावडे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर पुन्हा संभाजीराजेंनी प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरा, असा सल्ला त्यांना दिला आहे.
विनोद तावडे यांनी डबे घेत पूरग्रस्तांसाठी मुंबईत मदत मागितल्याचा व्हिडिओ पाहून खासदार संभाजीराजे यांनी स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कुणाच्या भिकेची गरज नाही, महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी याविषयी त्यांनी संताप व्यक्त केला होता. यावर तावडे यांनी ट्विटरवर संभाजीराजेंना प्रत्युत्तर देत बोरिवलीतील रिक्षावाले, फेरीवाले यांच्या सामान्य नागरिकांनी जमा केलेला निधी पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात असताना, ही रक्कम संभाजीराजेंना भीक का वाटावी, असा सवाल केला. त्याला संभाजीराजेंनी पुन्हा ट्विटरवर उत्तर दिले आहे.
छत्रपती घराण्याच्यावतीने एकच सल्ला, लोकनियुक्त मंत्र्यांनी हातात कटोरा घेऊन फिरण्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा घेऊन फिरावे आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये जाउन मदत पोहोचवावी. कोल्हापूर, सांगली तसेच संपूर्ण महाराष्ट्रवासियांची ही स्पष्ट भावना आहे. पूरबाधितांना मदत देऊन राज्यभरातील सामान्य जनतेने नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. याचा अभ्यास मंत्र्यांनी करावा, असा उपहासात्मक सल्लाही तावडे संभाजी राजेंनी तावडे यांना दिला आहे.