नवी दिल्ली । आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होतेय. एकीकडे विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला चीन आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्यावरून घेरण्यासाठी तयार असतानाच पंतप्रधानांनी मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीलाच जवानांच्या पाठीमागे उभं राहण्याचं आवाहन विरोधकांना केलंय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात चीनसोबत सुरू असलेल्या सीमा वादावरून संदेश दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मला आशा आहे की खासदार एकजूट होऊन संदेश देतील की आम्ही देशातील जवानांसोबत उभे आहोत’ असं म्हणत विरोधकांना आवाहन केलंय.
‘हिंमत, उत्साह आणि आत्मविश्वासासह आपल्या सेनेचे वीर जवान सीमेवर उभे आहेत. दुर्गम भागांत ते देशाच्या संरक्षणासाठी उभे आहेत. काही वेळातच वर्फाचा वर्षावही सुरू होईल. ज्या विश्वासासोबत ते उभे आहेत, सदनाचे सर्व सदस्य एक स्वर, एक भाव, एक भावना आणि एका संकल्पानं हा संदेश देतील, की देश सेनेच्या जवानांच्या मागे भक्कमपणे उभा आहे. संसद आणि संसदेतील सदस्यांच्या माध्यमातून देश उभा आहे. हाच मजबूत संदेश हे सदनदेखील देईल. सर्व माननीय सदस्यांच्या माध्यमातून देईल’ अशी वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलीत.
यासोबतच पंतप्रधानांनी खासदारांनाही करोनासंबंधी काळजी घेण्याचं आवाहन केलं. ‘जेव्हापर्यंत औषध नाही तोपर्यंत कोणताही निष्काळजीपणा नाही. जगातील कोणत्याही कोपऱ्यात लवकरात लवकर लस तयार व्हावी, हीच आमची इच्छा आहे. आमचे तज्ज्ञ यात यशस्वी होवोत आणि सर्वांची या समस्येतून सुटका व्हावी’, असंही पंतप्रधानांनी म्हटलं. दुसरीकडे, कोसळलेली अर्थव्यवस्था आणि चीनच्या मुद्यावरून केंद्राला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झालेत. करोना संकटकाळादरम्यान या मान्सून सत्राची सुरूवात होतेय. या दरम्यान राज्यसभा आणि लोकसभेची कार्यवाही वेगवेगळ्या वेळी होणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.