टीम हॅलो महाराष्ट्र : सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनी याच्या चाहत्यासाठी आनंदाची बातमी आहे. दोघेही एकाच सामन्यात खेळताना दिसणार आहेत. धोनीने गेल्या वर्षी जुलैमध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. यानंतर तो एकाही सामन्यात दिसला नाही. आता या सामन्यात सचिन तेंडुलकर या आपल्या जुन्या साथीदारासोबत धोनी पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये लागलेल्या आगीत अनेक जण जखमी झाले. अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. या आग पीडित लोकांसाठी मदतनिधी उभा करण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये एका सामन्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये क्रिकेटमधून निवृत्त झालेले दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी देखील खेळण्याची शक्यता आहे.
मदतनिधीसाठीचा सामना ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. एका संघाचे नेतृत्व रिकी पॉन्टिंग करणार असून दुसऱ्या संघाचे नेतृत्व शेन वॉर्न करणार आहे. ब्रेट ली, जस्टिन लॅगर, मायकल क्लार्क, अॅडम गिलख्रिस्ट, शेन वॉटसन आणि अॅलेक्स ब्लॅकवेल हे खेळाडू देखील या सामन्यात खेळणार आहेत. मदतनिधी सामन्यातून जमा होणारी रक्कम ऑस्ट्रेलिया रेड क्रॉस संघटनेला दिली जाणार आहे.
या आधीही झाला होता मदतनिधीसाठी ‘सामना’
मदतनिधीसाठी होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाशिवाय अन्य देशातील खेळाडू देखील सहभागी होण्याची शक्यता आहे. याआधी देखील मदतनिधीसाठी झालेल्या सामन्यात स्टार क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. २००५ मध्ये त्सुनामी पीडित लोकांसाठी वर्ल्ड इलेव्हन आणि आशिया इलेव्हन यांच्यातील सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर झाला होता.