सातारा जिल्हा परिषद अंतर्गत 708 रिक्त जागा न भरल्याने कर्मचारी संघटना संतप्त

0
81
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या 18 विभागांमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून गट क मधील सरळ सेवेची भरती झाली नाही. परिणामी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा वाढता ताण येत आहे. विविध विभागात सुमारे 708 पदे रिक्त असून जिल्हा परिषदेने ही पदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला आहे.

या 708 जागांमध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य बांधकाम विभाग) -24, कंत्राटी ग्रामसेवक -33, औषध निर्माण अधिकारी- 11, प्रयोगशाळा तंत्रज्ञ -4, आरोग्य सेवक (पुरुष)-49, आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी कर्मचारी -159, आरोग्य सेवक (महिला) – 347, विस्तार अधिकारी (कृषी) -1, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 44, पशुधन पर्यवेक्षक – 25, वरिष्ठ सहाय्यक (लेखा)- 1, अंगणवाडी पर्यवेक्षिका -4, वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)-1, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)-5 अशा जागांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्येही सदस्यांनी वारंवार आवाज उठवला आहे. मात्र अद्याप तरी शासनाने ही पदे भरण्याचा निर्णय घेतला नसल्याने सर्वच विभागात कामाचा ताण वाढत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने शासनाकडे रिक्त पदांबाबत वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र अद्याप तरी भरती प्रक्रियेचा निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीचे सरकार सुशिक्षित बेरोजगारांना न्याय देण्यासाठी पावले उचलणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सुमारे 570 रिक्त पदे आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याने कामात सुसुत्रता येत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. कामाच्या वाढत्या ताणामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा रक्तदाब वाढत आहे. त्याचबरोबर त्यांची मानसिकता ढासळत असल्याने शासनाने तात्काळ भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी विविध कर्मचारी संघटनांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here