सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे पार पडलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या मेळाव्यांनी जिल्ह्यात विधानसभेचा बिगुल वाजला आहे. जिल्हयातील चार मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्याने युतीत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोरेगावात महेश शिंदे ,वाईमधून मदनदादा भोसले, कराड उत्तर मधून मनोज घोरपडे या युतीत शिवसेनेच्या वाटणीला गेलेल्या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी उमेदवारांची घोषणा केल्याने सेनेच्या कार्यकर्त्यांच्यात चुळबुळ सुरू झाली आहे.
साताऱ्याचे शिवेंद्रसिंहराजे भोसले तर माण-खटाव मधून जयकुमार गोरे हे भाजप मध्ये डेरेदाखल झाले आहेत याचा अर्थ आठपैकी सहा ठिकाणी उमेदवारी नक्की असेल तर शिवसेनेचे काय यावरून शिवसैनिक हवालदिल झाले आहेत. याबाबत शिवसेना उपनेते व कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष नितीन बानूगडे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कराड उत्तरसह जिल्ह्यातील पाच मतदारसंघ शिवसेना पूर्ण ताकतीने लढवणार असून कराड उत्तर, माण-खटाव, वाई, पाटण, फलटण, कोरेगाव हे मतदारसंघ सेना जिंकण्यासाठी लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी हणबरवाडी धनगरवाडी योजना व इंदोली आणि पाल उपसा सिंचन योजना याबाबत शासनाची आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
या योजनेवर शासनाने भरपूर निधी टाकला असून आता निधी वाचून कोणतेही काम रखडले नाही याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले. काही न काही कारणाने या योजना रडतखडत चालू होत्या मात्र कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष मिळाल्यापासून धनगरवाडी हा शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे.शिवसेना कराड उत्तरमधील तसेच जिल्ह्यातील कृष्णा खोरेचे सर्व प्रकल्प पूर्णत्वास नेणार आहे. कराड उत्तर व जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाट्याचे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे आहेत आणि या जागेवर शिवसेनेचे निष्ठावंत उमेदवार उभे राहतील. असे त्यांनी स्पष्ट केले.